जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

 6 लाख 40 हजारांची लाच घेताना एसीबीचा तहसीलदाराला दणका; अवैध वाळू उपसा प्रकरणात अंबड तहसीलदार विजय चव्हाण रंगेहात ताब्यात

जनसंवाद | बीड / छत्रपती संभाजीनगर: अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी लाखो रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड येथील तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी विजय लक्ष्मण चव्हाण (वय 47), पद – तहसीलदार, अंबड जि. जालना यांना दि. 06 जून 2026 रोजी सापळा कारवाईदरम्यान 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे 36 वर्षीय तक्रारदाराने 26 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी 8 दिवसांच्या बदल्यात तब्बल 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 8 लाख रुपये यापूर्वीच देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच 6 हायवा टिप्परद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी प्रति टिप्पर 50 हजार रुपये प्रमाणे आणखी 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता आरोपी तहसीलदाराने पोकलेन मशीनसाठी उर्वरित 4 लाख रुपये तसेच 6 हायवा टिप्परसाठी तडजोडीअंती प्रत्येकी 40 हजार रुपये प्रमाणे 2 लाख 40 हजार रुपये अशी एकूण 6 लाख 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर दि. 06 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवल मार्वल सोसायटी परिसरात शासकीय पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

आरोपीच्या अंगझडतीमध्ये एक सॅमसन कंपनीचा मोबाईल, ॲपन कंपनीचे घड्याळ, पिवळ्या धातूच्या दोन अंगठ्या, एक पेंडंट लॉकेट तसेच 6 हजार 370 रुपये रोख रक्कम आढळून आली. घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

या प्रकरणी पोस्टे सातारा, जि. छत्रपती संभाजीनगर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा कारवाईतील अधिकारी

सापळा अधिकारी म्हणून श्री. सोपान चिटमपल्ले, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. बीड यांनी कारवाई केली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक समाधान कवडे काम पाहत आहेत.

या कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

नागरिकांना आवाहन

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांक : 1064

व्हॉट्सॲप : 9270221064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed