जनसंवाद /कुर्डुवाडी दि ५: पतीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीने त्याच्यावर उकळते तेल टाकल्याने गंभीर भाजलेल्या पतीचा उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूस कारण ठरल्याचा आरोपी असलेल्या पत्नीची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही के मांडे यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात टेंभुर्णी ता. माढा पोलिस ठाण्यात मयत फिर्यादी शहाजी गोविंद ढवळे यांनी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान दिलेल्या जबाबात जमिनीच्या व भावकीच्या वादातून संतोष ढवळे व नरसिंह ढवळे यांनी उकळते तेल अंगावर टाकल्याचा आरोप करत दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरुद्ध भा.द.वि. ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस तपासात दोघांना सी.आर.पी.सी.१६९ अन्वये दोषमुक्त करत फिर्यादीच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर आरोपी अनिता उर्फ वनिता शहाजी ढवळे हिच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदार व इतर पुरावे आरोपीविरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करू शकत नसल्याचे निरक्षण नोंदवत सबळ पुराव्या अभावी आरोपी महिलेस संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.या प्रकरणात सरकार तर्फे ऍड. डी. डी. देशमुख तर आरोपी तर्फे ऍड हरिश्चंद्र कांबळे यांनी काम पाहिले.