जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत असल्याने अवैध साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई

1 min read
20260328 165805
  • सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत असल्याने मार्च रोजी चा आदेश रद्द
  • कृषी व औद्योगिक वापरासाठी डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात खरेदी करता येणार
  • मुबलक प्रमाणात डिझेल, पेट्रोल उपलब्ध असल्याने नागरिकांनी त्याचा साठा करून ठेवू नये, अवैध साठा आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार

सोलापूर, दि. 28 मार्च – सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पूर्वी जारी करण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 20 मार्च 2026 रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीसंदर्भात आदेश जारी करण्यात आला होता. यानुसार १. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक मालक यांनी पेट्रोल/डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. २. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल/डिझेल खुल्या (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात) विक्री/पुरवठा करू नये, असे या आदेशात नमूद करण्यात आलेले होते.

  सद्यस्थितीत BPCL, IOCL व HPCL या कंपन्यांकडे जिल्ह्यात पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाच्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यालयाचा आदेश दिनांक 20.03.2026 रद्द करण्यात आला असून हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

    जिल्ह्यात कृषी, औद्योगिक तसेच अन्य महत्वपूर्ण कामासाठी पेट्रोल डिझेल आवश्यक आहे. सध्या ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तरी नागरिक, शेतकरी व व्यापारी यांनी पेट्रोल, डिझेलचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा, परंतु त्याचा अवैध साठा करू नये. असा इंधनाचा साठा करणाऱ्या संबंधितावर प्रशासन कठोर कारवाई करणार आहे, असे ही सूचित करण्यात येत आहे.

    या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *