रणसंग्रामराजकीय

मतदारांनो… मतदान करण्यापूर्वी प्रत्येकाने हे वाचा; विचार करा आणि मगच मतदान करा.

जनसंवाद/ कुर्डुवाडी दि.३०: कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीची रनधूमाळी चांगलीच रंगलीय. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार युती करून जुने + नवे चेहरे निवडणूक रिंगणात उतरवलेत. परंतु यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे नेत्यांना स्वप्न पडले होते का? तर नाहीच कारण शहरातील अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या नागरिकांनी म्हणजे तुम्हीच आवाज उठवला आणि सर्वच पक्षांना तुमची दखल घ्यावीच लागली म्हणून तरूणांना संधी मिळाली आहे. इथे नागरिक म्हणून तुमचा पहिला विजय झाला आहे.

कुर्डुवाडी शहराचा नागरिक म्हणून पहिला विजय मिळवला आता मतदार म्हणून दुसरा आणि अंतिम विजय मिळवण्याची वेळ आली आहे. नागरिक म्हणून मिळवलेला पहिला विजय अंतिम विजयात रुपांतरित करायचा असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक शोधावी लागतील. तुम्हाला योग्य उत्तर मिळाले की मतदान कुणाला करायचे हे कोणीही सांगण्याची गरजच राहणार नाही.

कुर्डुवाडी शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला. परंतु शहराचा किती विकास झाला? विकासकामात भ्रष्टाचार झाला असे आपण म्हणतो पण तो भ्रष्टाचार कोणी केला? भ्रष्टाचार होत असताना विरोधक कुठे होते? भ्रष्टाचार थांबवण्यासाठी विरोधकांनी काय उपाययोजना केल्या? याचा पण विचार केला तरच शहराला बकाल करणारे कोण हे जाणवेल. भ्रष्टाचाराविरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला त्यापैकी कीतीजण निवडणूक रिंगणात आहेत आणि किती जणांना एकाही पक्षाने संधी दिली नाही?

शहरात झालेल्या मोठमोठ्या कामांची टेंडर कुणाला दिली गेली? कामे कोणी केली? कामे निकृष्ट होत असल्याच्या तुम्ही केलेल्या तक्रारीवर सत्ताधारी नेत्याने काय भूमिका घेतली? भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी काय केले? विरोधक म्हणून विरोधकांनी काय केले? विरोधकांनी पाठपुरावा केला असेल तर त्यातून निष्पन्न काय झाले?

कुर्डुवाडी शहर गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शहरातील अवैध धंद्यांना वरदहस्त कुणाचा आहे? शहरात सहज उपलब्ध होत असलेल्या मटका, जुगार, शेकडो किलो गांज्या, अवैध दारू, आणि इतर अमली पदार्थांमुळे तरुणांचे आयुष्य बरबाद करणारे आणि अशा धंद्यांना अभय देणारे कोण? अवैध धंद्यांविरोधात ज्यांनी आवाज उठवला त्याचे पुढे काय झाले? तत्कालीन सत्ताधारी असोत, विरोधक असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते असोत ज्यांनी चांगले काम केले त्यांचे काम विसरून चालणार चालणार नाही.

शहरात किराणा दुकान असल्याप्रमाणे अवैध धंद्याची, मटक्याची दुकाने थाटलेली दिसतात. निवडणूक प्रचाराच्या कालावधीत तर हेच धंदे तेजीत दिसत आहेत. हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असूनही अवैध धंदे शहरात खुलेआम कुणाच्या जीवावर चालतात? तुम्ही निवडून दिलेले सत्ताधारी आणि विरोध मिळून अवैध धंदे बंद करण्यासाठी एक ठराव पोलिस स्टेशनला देऊ शकत नाहीत का? यापूर्वी अशाप्रकारचा एखादा ठराव नगरपरिषदेने पारित केला आहे का? शहर बीटमधील पोलिसांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची पकड का नाही ?

रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण वगैरे या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असतेच परंतु मूलभूत सुविधा पुरवत असताना योग्य प्रकारे काम होते का हे पाहण्याचे काम विरोधकांचे असते. हे काम सत्ताधारी आणि विरोधकांनी इमाने इतबारे केले आहे का? रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधेशिवाय तरुणांना व्यसनातून वाचवण्यासाठी जुगार, मटका, गुटखा, जीवघेण्या वेगवेगळ्या ऑनलाईन गेम आणि तर अवैध धंदे बंद करण्यासारखे जनतेच्या हिताचे विषय भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे यासाठी निधीची गरज नसून इच्छाशक्तीची गरज आहे. असे अत्यंत महत्वाचे विषय किती पक्षांच्या अजेंड्यावर आहेत? किंवा किती नेत्यांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात आवाज उठवला किंवा आपली ताकद दाखवली?

 प्रत्येक राजकीय पक्षाने आपापला अजेंडा जाहीर केला अजेंड्यातील बऱ्यापैकी विषय निधीशी संबंधित आहेत. आजपर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येकाचा अजेंडा शोधून पहा. थोड्याफार फरकाने त्याच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिसेल. ठराविक समस्यांच्या पुढे का जाता येत नाही? जर प्राथमिक समस्या त्या त्या वेळी संपवल्या असत्या तर शहर आधुनिक करण्यासाठी प्रत्येकाच्या अजेंड्यावर वेगळेच विषय दिसले असते. वचनपूर्ती न करणाऱ्यांना घरी बसवण्याची ताकत फक्त तुमच्या एका मतामध्ये आहे हे ओळखून मतदार म्हणून योग्य उमेदवार निवडणून देण्याची जबाबदारी तुमची नाही का?

सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी, ३६५ दिवसाची पाणीपट्टी भरून शहराला पाणीपुरवठा ३६५ दिवसातून किती दिवस होतो? पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य पाणी मिळते का? जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती असो किंवा नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव असो हे वेळेवर का झाले नाही? यासाठी जबाबदार कोण?

महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी प्रत्येक महापुरुषांच्या समाजाने सुशोभीकरणाची मागणी केली. महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी जो निधी मंजूर झाला तो निधी कुठे आणि किती वापरला? निधीचा पुरेपूर वापर झाला का? जर पुरेपूर वापर झाला नसेल तर उर्वरित निधी कुणाच्या घशात गेला?

शहरातील रस्त्यांवर रात्री ११-१२ वाजता एकटी महिला बिनधास्तपणे घराबाहेर पडू शकते का? बाहेर पडल्यावर व्यसन करून झिंगलेला एकदा व्यक्ती रस्त्यावर असेल तर ती महिला पुढे जाण्यास धजावू शकते का? वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही असेल तर महिलांचा प्रश्न सोडवू शकेल अशाच व्यक्तीच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे की नाही?

 

३-४ वर्ष उकरून ठेवलेले रस्ते, रस्त्यावरून उठणारे धुळीचे लोट आणि धुलीकणांमुळे लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत झालेला त्रास कुणामुळे झाला? धुळीमुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे झालेले नुकसान, अनेकांना शहरातील व्यवसाय बंद करून शहराबाहेर जावे लागले याला जबाबदार कोण? कुर्डुवाडीतील विस्थापित झालेल्या बाजारपेठांमुळे आसपासच्या १०-१२ गावातील ग्राहकांनी गावातच खरेदीला दिलेल्या प्राधान्यामुळे नुकसान कुणाचे झाले? या नुकसानीला जबाबदार कोण?

 

पार्टी प्रमुखाला सहीचा अधिकार असला काय अन् नसला काय एकहाती अधिकारावर सहीचा फरक पडतो का? कार्यकाळात झालेल्या चांगल्या वाईट कामाचे श्रेय आणि जबाबदारी पार्टी प्रमुखाची नसते का? चांगल्या कामाचे श्रेय सर्वजण घेताना दिसतात मग चुकीच्या कामाची जबाबदारी प्रांजळपणे कोणीच का स्वीकारत नाहीत?

तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य चोऱ्या करीत असेल तर तुम्ही त्याला सजा देता का समर्थन? कोणताच कुटुंबप्रमुख समर्थन देणार नाही हे उघड सत्य असताना सत्तेत सर्वकाही उलट का होते? मग सत्तेतील प्रमुख शहराला कुटुंब समजत नाहीत का?

शहरातील कचरा, पावसाळ्यात जागोजागी साठणारे पाणी, पावसाळ्यात उलट वाहणाऱ्या गटारी, रस्त्यावरून वाहणारे चेंबरमधील घाण पाणी, मलनिस्सारणाच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे घातक परिमाण आणि डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी मुकावे लागलेले प्राण यास जबाबदार कोण? कचरा दिसला की कुर्डुवाडी सुरू झाली असे जे चित्र निर्माण होतंय ते कायम असेच ठेवायचे की बदलायचे?

निवडून येण्यापूर्वी आपापल्या व्यवसायातून निर्माण झालेली संपत्ती किती होती? आजरोजी संपत्ती किती आहे? निवडून आल्यानंतर करोडो रुपयांच्या गाड्या, लाखो, कोटींचे बंगले आणि त्यांच्या परंपरागत व्यवसायातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ लावण्याचा एकदा प्रयत्न करून पाहण्यास काय हरकत आहे? विकासाची पाईपलाईन कुणाच्या घरातून जाते हे शोधले पाहिजे की नाही?

युवकांच्या हाताला काम देण्याऐवजी हातात जुगार खेळण्यासाठी पत्ते देणारे लोक नगरपरिषदेत असावेत का? मटक्याच्या आकडेवारीत घरातील अर्थकारण बुडवणारे मटकेवाले नगरपरिषदेत असावेत का? दहशत, गुंडगिरी, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि तमाम अवैध धंद्यांना अभय देणाऱ्यांना आपण मत देणार का?

मतदारांनो, तुमच्या कुटुंबाच्या, पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी तोलामोलाचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी तुमचीच आहे. शहराचा होत असलेला ऱ्हास आणि ठरावीक नेत्यांचा रातोरात होणारा विकास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहत आहात त्यामुळे सज्जन कोण? चोर कोण? हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. मूलभूत सुविधा, उत्तम आरोग्य सेवा, चांगले शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त शहर, दहशतमुक्त, भयमुक्त शहर आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य उमेदवाराला निवडून देण्याची आणि भ्रष्टाचारी उमेदवारांना घरी बसवण्याची ताकत तुमच्या फक्त एकाच मतांमध्ये आहे. जेव्हा भ्रष्टाचारी सत्तेपासून कोसो दूर असतील तेव्हाच मतदार म्हणून तुमचा विजय झालेला असेल यामध्ये तिळमात्रही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *