नवतेजस्विनी महोत्सव” : महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
1 min read
सोलापूर, दि. २२(जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळ (मावीम), जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने मावीमच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. २३ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत यशराज लॉन्स, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर येथे “नवतेजस्विनी महोत्सव” या नावाने महिला बचत गटांच्या उत्पादनांचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन मा. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या शुभहस्ते होणार असून मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सोलापूर, कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, विलास बच्चे, विभागीय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे विभाग, सिद्धराम माशाळे, विभागीय व्यवसाय सल्लागार माविम, चंद्रशेखर जगताप, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर तसेच इतर मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय या महोत्सवामध्ये महिला बचत गटांचा सन्मान समारंभ, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध विषयांवरील चर्चा सत्रे व मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ६० ते ७० महिला बचत गटांचे स्टॉल येथे उभारण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेली विविध दर्जेदार व घरगुती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामध्ये घरगुती मसाले, हळद पावडर, पापड, लोणची, शेवया, सांडगे, कुरडया, लाल व काळे तिखट, घाण्याचे तेल, दुग्धजन्य पदार्थ, ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या, सोलापुरी शेंगदाणा चटणी, लाडू, चिवडा, विविध धान्ये, हस्तकला साहित्य, कपडे, बॅगा, इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने आदींचा समावेश आहे.
तसेच माविम अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत सेंद्रिय भाजीपाला, फळे, कडधान्ये, ज्वारी, बाजरी, मका, सेंद्रिय गूळ, मध, मोरिंगा पावडर आदी उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावावा, असे आवाहन मावीमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. एम. एस. पटेल यांनी केले आहे.