व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारे गुरु रविदास हे विद्रोही क्रांतिकारी संत होते – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
जनसंवाद न्यूज नेटवर्क : भारतातील विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारे गुरु रविदास हे विद्रोही व क्रांतिकारी संत शिरोमणी होते असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथिल गुरु रविदास प्रेरणा केंद्रात आयोजित गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. नरसी येथील ज्येष्ठ नेते प्रकाशदादा भिलवंडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, भारतात कांही लोकांनी जाणीवपूर्वक माणसामाणसांत भेदभाव करणारी विषमतावादी व्यवस्था निर्माण केली होती. या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारुन गुरु रविदासांनी समतेवर आधारित मानवतावादी विचारांची पेरणी केली. यासाठी त्यांना बलिदान द्यावे लागले, याची आपण जाण असू द्यावी.
अ. भा. गुरु रविदास समता परिषद हे आपले स्वाभिमानी संघटन आहे, हे संघटन चालू ठेवा व संघटित राहाल तरच दखलपात्र राहाल. प्रेरणा केंद्रात भजन, आरत्या व भंडारे न करता येणाऱ्या काळात समाज प्रबोधनाचे काम झाले पाहिजे. गुरु रविदासाना देव समजून मंदिरात बंदिस्त करु नका तर त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन लायक बनण्याचा प्रयत्न करावा. बार बार मागणारे नाही तर देणारेही बनावे असेही शेवटी चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
याप्रसंगी भाजपचे नेते श्रावण पा. भिलवंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, कवी माधव बैलकवाड यांनीही आपले विचार मांडले. मंचावर माजी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, प्राचार्य मनोहर तोटरे, बहुजन समाज पक्षाचे नांदेड जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, राजेश भिलवंडे, समता परिषदेचे जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर, युवा विभागीय प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे, पत्रकार प्रकाश हणमंते, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ अक्कमवाड, गंगाधर भिलवंडे, गोविंद नरसीकर, लक्ष्मण कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन पत्रकार गंगाधर गंगासागरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हणमंत गंगासागरे, माधव गंगासागरे, सटवाजी बरबडे, गजानन गंगासागरे, गंगाधर मिस्त्री दुडकीकर, पांडू गंगासागरे, धोंडिबा कांबळे, शैलेश गंगासागरे, सुरेश कांबळे, अशोक गंगासागरे, आनंदा बरबडे, रोहिदास गंगासागरे, साईनाथ गंगासागरे, शशिकला कांबळे आदींनी परिश्रम घेतले.