जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

अरण येथे संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवर सभागृहात चर्चा

20260224 131957

वारकरी संप्रदायाच्या भावनांचा सन्मान राखत, समाधी सोहळ्यापूर्वी सर्वसंमतीने निर्णय घ्या; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२६ : संत परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या मूळ पादुका नेण्याच्या मागणीवर लक्षवेधीद्वारे चर्चा झाली. या विषयावर सभागृहात विविध सदस्यांनी मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या.

लक्षवेधी क्र. २ द्वारे सदस्य योगेश टिळेकर यांनी अरण येथे होणाऱ्या संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर मार्फत पांडुरंगाच्या मूळ पादुका आणण्याची मागणी मांडली. वारकरी संप्रदायाच्या भावना आणि संत परंपरेतील अध्यात्मिक संदर्भ लक्षात घेऊन समितीने आवश्यक तरतुदींमध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित न्यासच्या कामकाजाबाबत तक्रारींची चौकशी करून आवश्यक असल्यास प्रशासक नेमण्याची मागणीही करण्यात आली.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले की अरण येथे मूळ पादुका नेण्याची परंपरा अस्तित्वात नसून, सुमारे दीडशे वर्षांपासून स्थानिक परंपरेनुसार दुसऱ्या पादुकांची पालखी जाते. २०१४ पासून पंढरपूर ते आळंदी दरम्यान मूळ पादुका नेण्याची प्रथा सुरू झाली आहे; मात्र अरण संदर्भात अंतिम निर्णय संबंधित न्यासच्या बैठकीत घेतला जाईल. तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

चर्चेत सहभागी होताना सदस्य अमोल मिटकरी यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच मंदिर समिती व न्यासच्या मुदतवाढ आणि कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित केले.

यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संत परंपरा, वारकरी समाजाच्या भावना आणि कायदेशीर बाबी यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे नमूद केले. न्यासातील अनेक सदस्यांची कालमर्यादा संपल्याने सद्यस्थितीत न्यासची नाममात्र असल्याने त्यांनाही निर्णय घेतांना मर्यादा येत आहेत .न्यासाची सद्यस्थितीनव संभाव्य मतभेद लक्षात घेता सर्व संबंधित घटक , परंपरा अभ्यासक , वारकरी प्रतिनिधी आणि कायदेविषयक तज्ज्ञ यांची बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. समाधी सोहळ्यापूर्वी निर्णय व्हावा, असेही त्यांनी सभागृहातून सुचित केले.

या चर्चेमुळे संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अरण येथील धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाच्या भावना आणि मंदिर समितीच्या अधिकारक्षेत्राचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *