जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी कुर्डुवाडीचा आग्रह; मध्यवर्ती स्थान, रेल्वे जंक्शन आणि प्रशासकीय सुविधा ठरत आहेत जमेच्या बाजू

1 min read

जनसंवाद | कुर्डुवाडी : राज्य शासनाकडून पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, त्यासंदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहे.

 

नागरिकांच्या मते, केवळ एका तालुक्याचा विचार न करता संपूर्ण परिसरातील नागरिकांची सोय, वाहतूक व्यवस्था, विद्यमान शासकीय कार्यालये आणि भविष्यातील प्रशासकीय गरजांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. या सर्व निकषांवर कुर्डुवाडी अधिक सक्षम पर्याय ठरू शकते, असा दावा केला जात आहे. Facebook, instagram या समाज माध्यमावर मोठ्याप्रमाणात नागरिकांची मागणी दिसून येत आहे.

कुर्डुवाडीचे मध्यवर्ती स्थान महत्त्वाचे

कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि संपर्काचे केंद्र मानले जाते. पंढरपूर, मोहोळ, करमाळा, बार्शी, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांतील नागरिकांना येथे पोहोचणे तुलनेने सोयीचे आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाल्यास मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळू शकतो.

 

आधीपासूनच उपलब्ध शासकीय यंत्रणा

कुर्डुवाडीत आधीच अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. त्यामध्ये—

पंचायत समिती कार्यालय

पोलिस स्टेशन

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय

उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय

कृषी विभाग कार्यालय

वन विभाग कार्यालय

राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय

शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाउस)

प्रस्तावित सेशन कोर्ट

रेल्वे कारखाना

यामुळे नव्या कार्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय समन्वय अधिक प्रभावीपणे साधता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

रेल्वे जंक्शनमुळे मोठी सुविधा

कुर्डुवाडी हे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथे रेल्वे स्थानकासोबत बसस्थानक आणि आगारही उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूर येथील जिल्हा कार्यालये तसेच पुणे येथील विभागीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांना ये-जा करणे अधिक सुलभ होईल.

वाहतूक सुविधेमुळे नागरिकांचाही वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

नागरिक, प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासन यांना लाभ होणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कुर्डुवाडीत झाल्यास नागरिकांना शासकीय कामांसाठी कमी अंतर प्रवास करावा लागेल.

प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने होईल.

विविध विभागांमध्ये समन्वय वाढेल.

वेळ आणि आर्थिक खर्चात बचत होईल.

अनेक तालुक्यांतील नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होतील.

 

रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

स्थानिक नागरिकांच्या मते, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर कुर्डुवाडीत लघु व मध्यम व्यवसायांना मोठी चालना मिळेल. कार्यालयीन कामकाजामुळे निवास, भोजन, स्टेशनरी, वाहतूक, बँकिंग, सेवा उद्योग आणि इतर व्यावसायिक उपक्रम वाढतील. परिणामी स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि शहराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.

 

हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन

राज्य शासनाने प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागविल्या असल्याने, कुर्डुवाडीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मिळावे अशी भूमिका असलेल्या नागरिकांनी नियमानुसार आपली मते शासनाकडे लेखी स्वरूपात नोंदवावीत, असे आवाहन विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पाचकेशीतील नागरिक, सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

“कुर्डुवाडीचा विकास म्हणजे परिसराच्या विकासाला चालना” या भूमिकेतून नागरिकांनी एकमुखी पाठिंबा दर्शविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *