जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ; तीन एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यातील 150 ते 180 गावा मध्ये शासकीय योजनांचा प्रसार होणार

1 min read
2.jfif

सोलापूर, दिनांक 3(जिमाका):- जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत जिल्ह्यातील दीडशे पेक्षा अधिक गावांमध्ये विविध विभागाच्या पंधरा तर अनुसूचित जातीच्या दहा योजनांचे व्हिडिओ तीन एलईडी व्हॅन च्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. तरी या व्हॅन द्वारे केल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फित कापून केला.

     यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “एलईडी व्हॅनद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे नियोजित प्रत्येक गावातील शेवटच्या घटकातील नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे शक्य होईल. या उपक्रमामुळे जनजागृती वाढून योजनांचा प्रभावी वापर होण्यास हातभार लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

      जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एलईडी व्हॅनद्वारे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत दोन एलईडी व्हॅनच्या माध्यमातून विविध विभागांच्या 15 योजनांचे व्हिडिओ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये दाखविण्यात येणार आहेत, तर अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत एका एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जातींसाठी असलेल्या 10 योजनांचा प्रचार 11 तालुक्यातील प्रत्येकी किमान 5 ते 7 गावांमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी श्री. सोनटक्के यांनी दिली.

    दिनांक 2 मार्च 2026 पासून पुढील वीस दिवस हा उपक्रम राबविला जाणार असून, या काळात एलईडी व्हॅन जिल्ह्यातील किमान 150 ते 180 गावांपर्यंत पोहोचून नागरिकांना योजनांची माहिती देणार आहे. यामुळे सर्वसाधारण विभागाच्या 15 योजना तसेच अनुसूचित जातींसाठी असलेल्या 10 योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *