जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

ज्येष्ठ नागरिकांसाठी कुर्डुवाडी पोलिसांनी आयोजित केलेली जनजागृती व संवाद बैठक संपन्न

1 min read

जनसंवाद | कुर्डुवाडी दि. ८ : दिवसेंदिवस वाढत असलेली सायबर फसवणूक, चोरीच्या उद्देशाने पडणारे दरोडे, अथवा अन्य कारणांनी जेष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक होऊ नये यासाठी कुर्डुवाडी पोलिस पुढाकार घेत असून भविष्यातील गुन्हे टाळण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची आज दिनांक ८ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत जनजागृती व संवाद बैठक आयोजित करण्यात आली.

      सदर बैठकीमध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत, तक्रार अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित बीट अंमलदार अथवा कुर्डूवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

       यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली. विशेषतः ओटीपी (OTP), बँक खाते, एटीएम पिन (ATM PIN) सीसीव्ही नंबर (CVV) पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी व्यक्तींना ओळख पटल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये, याशिवाय ११२ व १९३० या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देऊन आवश्यक प्रसंगी त्यांचा उपयोग करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

सदर बैठकीस अंदाजे ३५ ते ४० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.अतुल मोहिते आणि पीएसआय श्रीमती सारिका गटकुळ यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *