तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका; भेसळ, अवैध दारू आणि बनावट औषधांवर राज्यभर कारवाई
1 min read
जनसंवाद/मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध दारू आणि बनावट औषधांविरोधात मोठी मोहीम उघडली असून सलग कारवायांमुळे भेसळ माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर तुकाराम मुंढे यांनी थेट भिवंडी परिसरात धाडी टाकत भेसळयुक्त दारू उत्पादन करणाऱ्या ठिकाणांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याचबरोबर FDA ने गेल्या तीन दिवसांत राज्यभरात 27 आस्थापनांवर कारवाई करत 33 जणांना अटक केली आहे. दूध, आईस्क्रीम, नूडल्स, आंबे यांसारख्या पदार्थांची तपासणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही,” असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
दरम्यान, अवैध औषध उत्पादन आणि भ्रामक जाहिराती प्रकरणी देखील FDA ने मोठी कारवाई केली असून सुमारे 73 लाख रुपयांचा संशयित औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. काही उत्पादन कंपन्यांवर धाडी टाकून तपास सुरू करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवायांमुळे सोशल मीडियावरही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन व्यक्त केले जात आहे. अनेकांनी “महाराष्ट्राला अशाच अधिकाऱ्यांची गरज आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.