जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

1 min read
20260224 215355

मुंबई, दि.24 :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहावी व बारावी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. राज्यातील 17 हजार अनुदानित शाळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित 4 हजार शाळात लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

राज्यातील शाळेतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अभ्यंकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 65 हजार शाळांपैकी जिल्हा नियोजन समितीच्या 5 टक्के निधीतून आतापर्यंत 18 हजार शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या निधीतून केवळ सीसीटीव्ही नव्हे तर कंपाउंड, वर्गखोल्यांची दुरुस्ती आदी कामेही केली जात असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, डोंगरी भागातील शाळांसाठी स्वतंत्र डोंगरी विकास निधी उपलब्ध असून त्या माध्यमातूनही या भागातील शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची सूचना करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *