दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. २३ : युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने जाणवते, असे सांगून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांच्या सहज, सरळ आणि सर्वांना आपलेसे करून घेणाऱ्या स्वभावाचा विशेष उल्लेख केला.
दिवंगत अजित पवार यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा ठरेल आणि समाजजीवनाला दिशा देणारे ठरेल, असेही राज्यपालांनी नमूद केले.
वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित दिवंगत अजित यांच्या श्रद्धांजली सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर , विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी सरन्यायाधिश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी, अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, मंत्रीमंडळातील मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदे सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, निसर्गाने मानवाला काही मर्यादा घातल्या असल्या तरी त्याने जगलेले जीवन आणि समाजातील दुःखी व गरजू घटकांना दिलेला आधार यावरच त्याचे खरे महानत्व ठरते. “कीर्ती यशस्य जीवति” या तत्त्वानुसार महान व्यक्तींचे कर्तृत्व आणि त्यांचे आदर्श विचार त्यांना अमरत्व प्रदान करतात. अशा व्यक्तींची कीर्ती कोणत्याही काळात किंवा परिस्थितीत नष्ट होऊ शकत नाही, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटले.
दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘रिअल स्टार’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. राज्याच्या जडणघडणीच्या इतिहासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘ रिअल स्टार’ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसभेत म्हणाले, दिवंगत अजित पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची माहिती त्यांना होती. उत्तम प्रशासकासाठी जे गुण आवश्यक असले पाहिजे ते संपूर्ण गुण अजितदादांमध्ये होते. त्यांनी केवळ अर्थसंकल्प मांडले नाहीत, तर त्यामधून राज्याला आर्थिक शिस्त लावली. लोकहिताचे निर्णय घेताना आर्थिक घडी विस्कटू नये, याची कटाक्षाने काळजी ते घ्यायचे. मंत्रिमंडळासमोर येताना त्यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास असायचा. प्रचंड निर्णय क्षमता असल्यामुळे ते तात्काळ निर्णय घेत दिलेला शब्द ते कधीही परत घ्यायचे नाहीत. ते परखडही होते.
उत्तम प्रशासन चालविण्याचे त्यांचे कौशल्य होते. त्यासाठी आवश्यक असलेली जरब त्यांच्याकडे होती. नेमकेपणा, शिस्त हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. राज्याच्या हिताचे नसलेले निर्णय ठामपणे रद्द करण्याचे त्यांचे धाडसही अनुभवले आहे. सार्वजनिक जीवनात त्यांचा जनसंपर्क होता, यासोबतच वैयक्तिक संबंध ठेवण्यातही त्यांची हातोटी होती.
महाराष्ट्रचा विकासाची गती कमी होऊ दिली नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाची गती कमी होऊ दिली नाही, यासाठी विकासकामांच्या दर्जात तडजोड केली नाही. आपली मते परखडपणे मांडताना, विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत काटकसर धोरणचा पाठपुरावा देखील करायचे आणि विकास प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी निधी तरतूद करताना अभ्यास पूर्ण माहिती सादर करीत असे नमूद करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि विकासाचा ताळमेळ साधण्याचं अवघड काम त्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस व काम सुरू व्हायचे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, अजित दादा आणि आमच्यातील समन्वय अतिशय चांगला आणि एकमेकांच्या मनातील ओळखणारा होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, विकास दृष्टी असलेल्या नेत्याला आपण गमावले आहे. नुकतेच पुण्यासाठी काही तरी करा म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू होता, यातून केंद्र सरकार कडून या तीन मजली उन्नत पुल मंजूर केला होता.
विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी नवी दिल्ली, नागपूर येथे देखील भेट घेऊन माहिती द्यायचे. फक्त प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा न करता प्रत्यक्ष विकास प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन जबाबदारीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रगतीचा आढावा घेताना त्यांना पाहिले. असे केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी म्हणाले
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मुलं पार्थ व जय यासह पवार कुटुंबीयाच्या सांत्वनसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावरील आणि राजकीय कौटुंबिक क्षेत्रातील कारकीर्द यावर चित्रफितीं प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.