प्रकाशक/संपादक : एस.एस. वाघमारे
जनसंवाद/कुर्डुवाडी दि.२७: कुर्डुवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी, माजी आणि नवख्या तरुण उमेदवारांनी प्रचारात पूर्णतः झोकून दिले आहे. या निवडणुकीत अनपेक्षित अशी नवी समीकरणे जुळून आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर.पी.आय (आठवले) गटाच्या प्रचारकारिता उपमुख्यमंत्री तथा “अर्थ” मंत्री अजित पवार उद्या (गुरुवार दि.२८) कुर्डुवाडीत येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर.पी.आय (आठवले) गटाने नगराध्यक्ष पदासाठी सुरेखा निवृत्ती गोरे यांना उमेदवारी देऊन 10 प्रभागातील सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभा केले आहेत. मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी तर दिली आहेच शिवाय नगरपरिषदेचा कारभार सुरुळीत चालण्यासाठी माजींना उमेदवारी देऊन नवखे आणि अनुभवी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
सध्या सर्वच पक्षांचा फोकस नगराध्यक्ष पदावरच जास्त असल्याचे दिसून येते. अजित पवार ज्यांच्या प्रचारासाठी कुर्डुवाडी शहरात येत आहेत त्या उमेदवारांपैकी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा गोरे यांचे पती निवृत्ती गोरे हे माजी नगराध्यक्ष आहेत.
माजी आमदार संजय मामा शिंदे यांची अजित पवारांशी असलेली जवळीक, अजित पवारांकडे असलेले अर्थमंत्रि पद आणि अजित पवारांचे आपल्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच असलेले झुकते माप अशा विविध कारणांनी मतदारांवर उद्याच्या सभेची जादू होणार का याकडे सर्वच पक्षातील नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि भाजप कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत समोरासमोर उभा ठाकले आहेत. राज्यात युतीचे सरकार आणि कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढाई सुरू असली तरी मित्र पक्षातील उमेदवार अजित दादांचे सॉफ्ट टार्गेट असू शकतात. मात्र उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मात्र “मुख्य टार्गेट” असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर.पी.आय (आठवले) गटाच्या प्रचारकारिता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि खासदार सुनिल तटकरे यांची संयुक्त सभा कुर्डूवाडी येथील गांधी चौकात नुकतीच पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची ही दुसरी सभा असून उद्याच्या सभेतून मतदारांमध्ये किती परिवर्तन घडणार हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.