ताज्या बातम्यामाढा-करमाळारणसंग्रामराजकीयसोलापूर जिल्हा

कुर्डुवाडीची बदलती राजकीय समीकरणे कुणाच्या पथ्यावर पडणार?

प्रकाशक: एस.एस. वाघमारे

कुर्डुवाडी, दिनांक २४ : यंदाची कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होत आहे. गत वर्षीची निवडणूक अखंड शिवसेना म्हणून धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाखाली जिंकून शिवसेनेने आपले वर्चस्व अबाधित राखले होते. तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी विरोधकांकडे सत्ता असूनही करोडो रुपयांचा निधी नगरपरिषदेला मिळवून दिला नव्हे खेचून आणला. कुर्डुवाडी शहराच्या विकासासाठी मिळालेल्या भरमसाठ निधीमुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे समजणे अवघड झाले होते. विरोधी पक्षाने विरोधकांची भूमिका साकारलीच नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तरुणांनी निवडणूक हातात घ्यावी असा मतदारांचा सुरू दिसून आला.

 

व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक या समाज माध्यमांवर अगदी कोविड काळापासून सत्ताधारी आणि विरोधकांवरही टीकेची झोड उठलेली दिसून आली. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भुयारी गटारी आणि खोदून ठेवलेले रस्ते यामुळे शहरात सर्वत्र धुरुळा अन् फुफाटा अशी अवस्था झाली होती. त्यावेळी शहरातील मतदारांसोबतच कुर्डुवाडी शहरात कामानिमित्त येणारे १०-१२ गावातील नागरिकही अक्षरशः वैतागले. खरेदीसाठी कुर्डुवाडी शहराशिवाय इतरत्र पर्याय शोधू लागले. शहर भकास झाले, ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली, काही व्यापाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन बायपासला दुकाने थाटली. अनेक नवीन व्यवसाय याच काळात बायपासला भरभराटीला आले. परंतु शहरातील बाजारपेठ कोलमडली.

 

नंतरच्या काळात भुयारी गटार, रस्ते तयार झाले परंतु या कामांचा दर्जा पाहण्याची तसदी विरोधकांनी घेतली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक सत्ताधारी आणि विरोध दोघांवर कमालीचे नाराज झाले. या नाराजीतून “नवे पर्व युवा सर्व” ही घोषणा समोर आली. शहरातील युवकांनी निकृष्ट कामांवर बोट ठेवण्यास सुरुवात केली. मतदार नागरिकांनीही युवकांसा समर्थन देण्यास सुरुवात केली. बदल हवा पण नवीन चेहऱ्यांसह अशी मतदारांची धारणा झाली. यापुढे युवकांना संधी द्यावी लागणार हे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या लक्षात आले.

 

नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अनेक जुन्या सहकाऱ्यांचा पत्ता कट करावा लागणार हे सर्वांनाच माहीत होते. आपला पत्ता कट होणार याची ज्यांना ज्यांना खात्री होती त्यांनी इतर पक्षाचे पर्याय शोधून आपले स्थान भक्कम करून ठेवले. काहीजणांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला तर काही जणांना अर्ज काढण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे):

 शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा नवीन पक्ष स्थापन झाला. धनंजय डिकोळे यांनी उद्धव ठाकरेची शिवसेना निवडली. नगरपरिषदेवर सत्ता अखंड शिवसेनेची आली मात्र शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने कुर्डुवाडी शहरातील काही नगरसेवक, शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत राहिले. उबाठा गटाची ताकत साहजिकच कमी झाली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले त्यातील काहीजण उबाठा गट सोडून इतर पक्षात गेल्याने धनंजय डिकोळे यांना जनतेचा रोष कमी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु सत्ताधारी प्रमुख म्हणून मागील ७-८ वर्षातील चांगल्या कामाचे श्रेय आणि झालेल्या आरोपांची जबाबदारी स्वीकारून मतदारांना सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय (आठवले):

राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय सोबत युती करून माजी नगराध्यक्ष समीर मुलांनी यांना सोबत घेऊन संजयमामा शिंदे यांनी जुळवलेली जातीची समीकरणे कितपत यश मिळवून देतात याकडे सर्वच पक्षांचे लक्ष असून या आघाडीला शह देण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवल्या जात असल्याचे दिसून येते.

संजयमामा शिंदे आमदार असताना विरोधकांची सत्ता असलेल्या नगरपरिषदेला मिळवून दिलेला भरघोस निधी संजयमामा शिंदे यांचा आघाडीसाठी जमेची बाजू ठरणार आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्या निधीचा शहराच्या विकासासाठी कसा वापर केला हा संशोधनाचा विषय असल्याने संशयाची सुई आपसुकच शिवसेना उबाठाकडे वळते. मात्र उबाठाचे तत्कालीन कॅप्टन मागच्या बाकावर का होईना पण राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान आरोप करताना थोडी गोची होणार आहे हे निश्चित.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही युती मजबूत समजली जात आहे. मात्र ऐनवेळी समोर आलेल्या (की आणलेल्या) भूतकाळातील प्रकरणांचा फटका बसतो की ट्रॅप समजून मतदार अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात यावर बरेच अवलंबून राहणार आहे. प्रचारादरम्यान सुरू असलेली क्रॉस वोटिंगची चर्चा खरी ठरली तर बिकट स्थिती उद्भवू शकते. अर्थातच क्रॉस वोटिंग सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अजूनही संधी आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंगचा विषय तूर्तास तरी धोकादायक वगैरे म्हणणे योग्य ठरणार नाही.  सत्तेच्या महत्वाच्या खुर्चीवर बसलेले अजित पवार आणि संजयमामा शिंदे यांची जवळीक असल्याने निधीची चनचन भासणार नाही याची मतदारांना दिलेली ग्वाही आणि आमदार असताना नगरपालिकेला मिळवून दिलेला भरघोस निधी ही जमेची बाजू मानली जातेय.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष:

अनैसर्गिक युती. दोन पक्ष फुटून चार पक्ष झाल्याने अर्थातच ताकद कमी झाली. कमी झालेली ताकद भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी शप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत आहेत. काही अंशी ताकत वाढली आहेच परंतु समोर तगडी आव्हाने आहेत. दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांची युती झाल्याने दोन्ही पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना आणि मतदारांना कितपत रुचली हे निकालातून स्पष्ट होईल. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांचे कुर्डुवाडी शहरातील हक्काचे मतदार, दत्ताजी गवळी यांनी निकृष्ट कामांबाबत केलेली आंदोलने, पाठपुरावा आणि जनजागृती या बाबी जमेच्या दिसून येतात.

 

काँग्रेस आय:

महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष काँग्रेस असला तरी कुर्डुवाडी शहरात महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्र लढत आहे तर राष्ट्रवादी (शप) ने शिवसेना (शिंदे) सोबत युती केल्याने कुर्डुवाडी शहरात काँग्रेस पक्ष एकटा पडला तरीही फिरोज खान यांनी नवे चेहरे मैदानात उतरवत हम भी किसी से कम नहीं म्हणत काँग्रेसचे अस्तित्व जपण्याचा केलेला प्रयत्न दाद देण्यासारखा आहे.

 

भारतीय जनता पार्टी:

भारतीय जनता पार्टी यापूर्वी सत्तेत नसल्याने पर्यायाने भ्रष्टाचाराचा कलंक नसल्याने मतदारांची नाराजी दूर करण्याच्या कसरतीतून मुक्त आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची तरुण फळी तयार झालेली आहे. तरुणांनी राजकारणात यावे, भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवावे ही मतदारांची मानसिकता ओळखून एक उमेदवार वगळता भाजपने सर्व नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी सहज मिळू शकतो हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यास भाजप यशस्वी ठरताना दिसत आहे. एक उमेदवार वगळता इतर सर्वच्या सर्व उमेदवार नवखे असल्याने प्रशासकीय अनुभवाची कमतरता नक्कीच जाणवणार.

 

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यापासून सोलापूरसाठी देत असलेला वेळ, त्यांच्या काळातील कामे पाहता कार्यतत्पर पालकमंत्री म्हणून ओळख असलेले जयकुमार गोरे कुर्डुवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने कुर्डुवाडी भाजपसाठी ही अत्यंत जमेची बाजू म्हणता येईल.

 

अपक्ष:

अपक्ष उमेदवारांना अजून चिन्हच मिळाले नसल्याने चिन्हवीना प्रचार सुरू. पक्षाची मते नसल्याने प्रभागातील सहकारी उमेदवारावर एकमेकांची मदार. समाजकार्यातून वाढलेला जनसंपर्क, राजकारणातून केलेली किंवा न केलेली विकास कामांवर सगळी मदार.

मागील कार्यकाळात शिवसेना उबाठा गटाचे धनंजय डिकोळे यांची सत्ता होती. जनतेचा रोष तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अतिशय तीव्र असल्याचे चित्र मागील ४ वर्षापासून दिसून येत आहे. समाज माध्यमांवर नागरिकांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या. पाणी पुरवठा, स्वच्छता, हद्दी बाहेरची विकास(?) कामे, भुयारी गटारीचे काम, पावसाळ्यात नागरिकांच्या घरात उलट दिशेने वाहणाऱ्या अंतर्गत गटारी, कचरा डेपो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, भाजी मंडई प्रश्न, रस्त्यावरील अतिक्रमणाला मिळालेला राजाश्रय, मोकाट जनावरे, मोकाट फिरणाऱ्या कुत्रांचाही बंदोबस्त न होणे अशा अनेक समस्या आजही आ वासून उभा आहेत.

सर्व पक्षांनी नवे-जुने उमेदवार देऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र भाजपाचा अपवाद वगळता कमी अधिक प्रमाणात जुने चेहरे सर्वच पक्षात आहेत. अटीतटीच्या लढतीमध्ये थोडेही गाफिल राहून चालणार नाही याची सर्वच उमेदवारांना कल्पना असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराला मैदानाबाहेरच रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचे एक दोन घटनेतून स्पष्ट झाले आहे. एकंदर ही निवडणूक कोणत्याच गटासाठी सोपी नाही. शेवटी मतदारच राजा आहे.

क्रमशः

(पुढील प्रत्येक भागात एकेका गटातील सर्व उमेदवारांचे सामाजिक कार्य, राजकीय पार्श्वभूमी, उद्योग, व्यवसायाचा आणि “धंद्याचा” लेखाजोखा.)

[प्रकाशक/संपादक: एस.एस.वाघमारे | 9421756655]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *