रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका):- विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाअधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली.
राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (DEMO) उपस्थित होते. रायगड जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आर.डी. संकपाळ यांनी यात सहभाग घेतला. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. भगवान पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तसेच सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार बैठकीला उपस्थित होते.
आरोग्य जनजागृती उपक्रम जनसंपर्क मोहिमा तसेच माध्यमांशी प्रभावी संवाद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नावीन्यपूर्ण माध्यम धोरण आखन्याची सूचना केली.
आरोग्य विषयक माहिती जनसामान्यांना सुलभभाषेत आणि आकर्षक पद्धतीने दिल्यास त्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेत मोठी भर पडेल प्रसारमाध्यमांशी सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संपर्क राखणे तसेच आरोग्याशी संबंधित नकारात्मक किंवा गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्यांना योग्य प्रतिउत्तर देऊन तथ्य मांडणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
सर्व जिल्हा माध्यम अधिकाऱ्यांना समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. विभागाच्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरील फॉलोवर्स वाढवण्यासाठी समन्वयित प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.
आरोग्य जनजागृती हा केवळ विभागाचा कार्यक्रम नसून तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने त्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षा डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केली.
बैठकीत जिल्हास्तरावर राबविल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमांचे अनुभव अडचणी व यशोगाथा याची देवाणघेवाण करण्यात आली, जनतेत आरोग्यविषयक जनजागृती वाढवण्यासाठी सर्व स्तरावर माहिती प्रसार मोहिमा अधिक सशक्त करण्यावर भर देण्यात आला.