ताज्या बातम्यासोलापूरसोलापूर जिल्हा

बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आयोजन

सोलापूर, दि. 12 (जिमाका) – 14 नोव्हेंबर हा देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर यांच्यातर्फे बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली आहे.

जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात, 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत, कारखाने, आस्थापना, हॉटेल, गॅरेज आणि धोकादायक उद्योगांना भेटी देऊन बालकामगार प्रथा विरोधी मोहिम राबवली जाईल. या मोहिमेत पोस्टर चिकटविणे, बालकामगार विरोधी पत्रके वाटप करणे, आणि जनजागृती करणे यांचा समावेश असेल.

कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळल्यास त्यांची मुक्तता केली जाईल आणि बालकामगार अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. बालकामगार आस्थापनांमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा असलेले आहे. त्यामुळे, 14 वर्षाखालील बालकामगार काम करत नाहीत याची हमी संबंधितांकडून घेतली जाईल.

हॉटेल असोसिएशन, दुकाने, व्यापारी संघटना, आणि औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन्ससह बैठका आयोजित करून, बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मधील तरतुदींची माहिती देण्यात येईल. या बैठकींमधून सामुदायिक शपथ घेणे आणि हमी पत्र भरून घेणे यांचा समावेश असेल.

सहाय्यक कामगार आयुक्त, निलेश येलगुंडे यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज आणि धोकादायक उद्योगांमध्ये बालकामगार ठेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *