Skip to content
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) कोल्हापूर व वनपाल करवीर, वनरक्षक करवीर हे 4 नोव्हेंबर रोजी टिंबर मार्केट या ठिकाणी फिरती करीत असताना गोपनिय माहितीनुसार कल्पना फर्निचर या दुकानामध्ये उभे आरायंत्र (वर्तुळाकार करवत) 18 इंच हे विनापरवाना वापरत असल्याचे दिसून आले. आरागिरणी यंत्र मालक राजू आनंदराव सुतार, रा.टिंबर मार्केट, कोल्हापूर यांच्याकडे आरायंत्राची परवाना मागणी केली असता आरायंत्र परवाना नसल्याचे सांगितले. हे आरायंत्र विनापरवाना असल्याचे निदर्शनास आल्याने वनरक्षक करवीर यांचेकडील महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 53 (10) व कलम 82 च्या अनुषंगाने गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले उभे आरायंत्र (वर्तुळाकार करवत) 18 इंच, व्हील 2, ब्लेड पाते 1 (120 इंच लांबी) इ. साहित्य जप्त करुन संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
गोपनिय माहितीद्वारे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) कोल्हापूर यांचेकडील अधिनस्त स्टाफ समवेत गेले असता गडमुडशिंगी पट्टणकोडोली रोडवरील चव्हाणवाडी परिसरातील रस्त्यालगत असणारे काजवे फर्निचर इंडस्ट्रीजची तपासणी केली त्यावेळी त्याठिकाणी 12 इंच दोन चाक असलेले बेंड सॉ मशिन विनापरवाना मिळून आल्याने आरोपी राजेश मारुती काजवे, रा. जाधववाडी ता. करवीर जि. कोल्हापूर यांच्याविरुध्द महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 53 नुसार वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) अन्वये वन गुन्हा नोंदविला असून हे मशीन वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर, संजय वाघमोडे विभागीय वनअधिकारी (दक्षता) कोल्हापूर, विलास काळे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्प) कोल्हापूर, नंदकुमार नलवडे वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश शेवडे वनपाल करवीर व वनरक्षक करवीर व प्रशांत आवळे वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) कोल्हापूर, साताप्पा जाधव वनपाल व रुकेज मुल्लाणी वनरक्षक यांनी केली आहे. विनापरवाना कोणी सॉमिल चालवत असल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. सदर व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व त्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन कोल्हापूर वनविभाग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.