रायगड-अलिबाग,दि.05(जिमाका):- “भुवनेश्वर परिसरात रविवारी रात्री धान्याच्या ट्रकला लागलेली आग, रोह्यात तांदळाने भरलेल्या 691 गोणी जळून खाक” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. दिवाळीत सरकारी धान्य वाटप करण्यासाठी सरकारी गोदामातून धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून तांदळाच्या 691 गाणी जळून खाक झाल्या. यात 345 क्विंटल तांदूळ होता. रविवारी मध्यरात्री 12:30 वाजता भुवनेश्वर गाव परिसरातील शासकीय गोदामाच्या आवारात घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भुवनेश्वर येथे शासकीय गोदामाच्या आवारात धान्याने भरलेला ट्रक उभा होता. दिवाळीच्या सुट्टीत चालक गावी गेला होता. रविवारी मध्यरात्री अचानक ट्रकला आग लागली. घटनेनंतर नायब तहसिलदार राजेश थोरे यांच्या समवेत संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धाटाव एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, असे बातमीपत्रात नमूद केले आहे.
या बातमीबाबत तहसिलदार रोहा डॉ. किशोर देशमुख यांनी वस्तुस्थितीदर्शक खुलासा केला आहे की, रोहा तालुक्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना दुकानांना भुवनेश्वर-रोहा येथील शासकीय धान्य गोदामातून धान्य पोहोच करण्यात येते. याकरिता भारतीय खाद्य निगम (FCI) डेपो, कळंबोली, ता.पनवेल शासकीय गोदामात धान्याची वाहतूक करण्यात येत असते. एफसीआय, कळंबोली येथून आलेली तांदळाची गाडी (वाहन क्र. एम.एच. 04 के.यू. 4588) भुवनेश्वर गोदाम परिसरात उभी असताना दि.20 ऑक्टोबर, 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनाने पेट घेतली. या वाहनामध्ये एकूण 691 गोणी (345.44 क्विंटल) शासन तांदूळ धान्य भरलेले होते. आग लागल्याच्या वेळी वाहनचालक घटनास्थळी उपस्थित नव्हते. घटनेची माहिती मिळताच संबंधित कर्मचारी, गोदामातील हमाल यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. तसेच आगीची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली. संबंधीत कर्मचारी, स्थानिक नागरीक व अग्निशमन दलाच्या मदतीने आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. आग विझल्यानंतर, उपस्थित रोहा गोदाम कर्मचारी व गोदामातील हमालांच्या सहाय्याने तात्काळ सदर वाहनातील धान्य गोदामात उतरविण्यात आले. या आगीमध्ये वाहनातील एकूण 45 गोण्यांची बारदाने अंशतः जळालेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्या गोण्यांतील तांदूळ चाळून, साफ केल्यानंतर तांदळाचे एकूण 687 गोणी (वजन 343.44 क्विंटल धान्य) गोदामात थप्पीमध्ये साठविण्यात आले असून हे धान्य रास्तभाव दुकानात वितरण करण्याची तजवीज ठेवली आहे. वाहनातील एकूण गोण्यांच्या तुलनेत 4 गोणी (2.00क्विंटल) तांदळाची घट आढळले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तसेच या प्रकरणी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयासही सादर करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार डॉ.किशोर देशमुख यांनी दिली आहे.